कसबे सुकेणे : सावधान.. सुकेणेकरांनो... तुमच्या आरोग्यासाठी आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तुमच्या गावच्या वेशीचा फतवा निघाला आहे. त्यामुळे तुम्हाला आता गावाच्या पूर्वापार प्रथेप्रमाणे वेशीतून जाणे-येणे वर्ज्य आहे, अशा आशयाचा फलक सध्या सुकेणेत लागला आहे.दरवर्षी फक्त बैल पोळ्याला बंद होणारी कसबे-सुकेणे गावाची पश्चिम वेश इतिहासात प्रथमच कोरोनामुळे गावकऱ्यांनी बंद केली असून, गावाबाहेरच्या पाहुण्यांना गावात येण्यास मनाई हुकूम लागू केला आहे. प्राचीन काळी गावात काही महामारी किंवा रोगराई आली तर गावाच्या वेशीवर किंवा वेताळ, मरीआईच्या देऊळ ही त्या गावाची सीमा असायची. ही सीमारेषा ओलांडणे म्हणजे गावाचा नियम मोडला गेला असे सर्वमान्य होते. परंतु पुरोगामी व आधुनिक महाराष्ट्रात या प्रथा परंपरा बदलल्या व बहुतांश गावांच्या वेशी नेस्तनाबूत झाल्या.परंतु कसबे-सुकेणे या गावाच्या मुख्य बाजारपेठेचा आरंभी आजही पोळा वेस उभी असून, हीच वेश आता सुकेणेकरांची लक्ष्मणरेषा ठरली आहे. या गावात वेशीचा मानही आज कायम आहे.कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गावकऱ्यांनी आता पोळा वेशीचा फतवा काढला असून, सुकेणेकरांनी या वेशीतून जाऊ नये आणि कोणी पाहुणा गावात वेशीतून आत येऊ नये. म्हणून चक्क वेशीचा दरवाजा बंद करून कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र केला आहे. कसबे-सुकेणे ग्रामपालिकेचे धनंजय भंडारे, छगन जाधव, विजय औसरकर, सुहास भार्गवे, बाळू कर्डक, प्रकाश धुळे आदींनी गावाची खबरदारी म्हणून पोळा वेश बंद केली. इतिहासात प्रथमच ही वेश पोळ्याच्या दिवसानंतर कोरोनामुळे बंद झाली आहे. त्यामुळे आता कसबे-सुकेणेकरांना ही वेस ओलांडणे म्हणजे गावकºयांच्या दृष्टीने गावाचा अपमान ठरणार आहे.सुकेणेकरांच्या आरोग्यासाठी आणि गाव राष्ट्रासाठी हा निर्णय गावाने घेतला आहे. कोरोना या विषाणूचे गांभीर्य सर्व जगाने घेतले आहे. त्यामुळे गावानेही याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी सहकार्य करून घराबाहेर पडू नये.-विजय औसरकर, कसबे-सुकेणे
कसबे-सुकेणेची वेस बनली लक्ष्मणरेषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 9:08 PM
सावधान.. सुकेणेकरांनो... तुमच्या आरोग्यासाठी आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तुमच्या गावच्या वेशीचा फतवा निघाला आहे. त्यामुळे तुम्हाला आता गावाच्या पूर्वापार प्रथेप्रमाणे वेशीतून जाणे-येणे वर्ज्य आहे, अशा आशयाचा फलक सध्या सुकेणेत लागला आहे.
ठळक मुद्देप्रवेशद्वार बंद : पाहुण्यांना गावात येण्यास मनाई