नाशिकरोड : वाचन संस्कृती अधिकाधिक जोपासली जावी, यासाठी प्रयत्न फारसे होत नाही. वाचन संस्कृती मशागतीने वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखा व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटर रोडवरील जैन भवनात नाशिककरांच्या वतीने शनिवारी (दि.२७) सत्कार करण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, शीतल सांगळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचे अध्यक्ष अभियंता उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, सावानाचे सचिव श्रीकांत बेणी, अॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, लेखक दु:खाची गाणी गातात. लेखकांनी वंचित घटकांच्या वेदना समाजापुढे मांडल्या पाहिजे, त्यांचा आवाज बुलंद केला पाहिजे. व्यवस्थेवर भाष्य करण्याचे धाडस लेखकांनी दाखविण्याची गरज आहे. सूत्रसंचालन कामिनी तनपुरे व रवींद्र मालुंजकर यांनी केले. लेखक जग बदलू शकत नाही; मात्र ते कसे असावे हे निश्चितच आपल्या लेखणीतून सांगू शकतो. तसेच स्त्रीभ्रुण हत्या व बालमजुरी हे देशाला लागलेले कलंक आहे. त्याचा साहित्यावर पडणारा प्रभाव विविध उदाहरणे देऊन देशमुख यांनी सांगितला.
लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिककरांच्या वतीने जैन भवनात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 1:24 AM