येवला : देशव्यापी संपामुळे येवला तालुक्यातील विविध शाळा, बँका, सरकारी दप्तरे बंद राहिल्याने कामकाज ठप्प झाले. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी तहसील आवारात सुमारे तीन तास धरणे दिले आणि न्याय्य मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी वासंती माळी आणि तहसीलदार नरेश बहिरम यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. न्याय्य लढा एकजुटीने देण्यासाठी समन्वय समिती गठित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.देशव्यापी संपामध्ये देशातील ११ केंद्रीय कामगार संघटना, केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे महासंघ, बँक, विमा, संरक्षण आदि क्षेत्रांतील कामगारांचे अखिल भारतीय महासंघ आणि अन्य क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार संघटना सामील झाल्या होत्या. यामध्ये राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही समावेश होता. त्यामुळे येवला तालुक्यातील सर्वच कार्यालयात शुकशुकाट होता. येवला तालुक्यातील ५४ माध्यमिक शाळांमधील ८३६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तहसील कर्मचारी, दूरसंचारचे १८ कर्मचारी, विविध बँक कर्मचारी संपात सहभागी असल्याने तालुक्यातील व्यवहार ठप्प झाले. विद्यार्थ्यांना प्रसार माध्यमातून अगोदरच संपाची हाक समजल्याने विविध विद्यालयात ३० ते ३५ टक्के मुले शाळेत आली. त्यांनीही मैदानावर खेळणेच पसंत केले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या आवारात, तालुक्यातील सुमारे ४०० शिक्षकांनी सुमारे तीन तास धरणे आंदोलन केले.या परिसरात घोषणायुद्ध छेडले. विविध संघटनांचे पदाधिकारी, माध्यमिक संघाचे अध्यक्ष दत्तकुमार उटावळे, सी. बी. कुलधर, नानासाहेब पटाईत, अण्णासाहेब काटे, सुनील गायकवाड, हरिश्चंद्र जाधव, डी. यू. कुलकर्णी, फेडरेशन प्रतिनिधी दत्ता महाले, दिगंबर नारायणे, शिवाजी भालेराव, रईस शेख यांनी भाषणात शासनाच्या शिक्षणविरोधी नीतीवर आगपाखड केली. आंदोलनात चंद्रभान दुकळे, इरेश भुसे, पंडित मढवई, आर. डी. पाटील, एस. के. शेलार, अर्जुन घोडेराव, दत्तात्रेय गाडेकर, गोरख येवले, अलगट, सी. बी. कुलधर, किशोर जगताप, विजय नंदनवार, बापू अहेर, चंपा रणदिवे, आसावरी जोशी, वीणा पराते, लता लिमजे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
येवल्यात तहसीलसमोर धरणे
By admin | Published: September 02, 2016 9:56 PM