नाशिक: कोरोना संक्रमणानंतर शिक्षणाची संकल्पनाच बदलू पाहत असून शैक्षणिक क्षेत्रात नव्या संकल्पनाची रुजवात होत असताना दिसते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठांच्या शिक्षणाची दिशा तर अधिक व्यापक होणार असल्याने पारंपरिक आणि विशेष विद्यापीठांची सीमारेषा पुसट होत जाणार आहे. विद्यापीठांमध्ये होऊ घातलेल्या या बदलाच्या अनुषंगाने आताच पायाभरणी सुरू केली असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गुरुवारी (दि. १) ३२ वा वर्धापन दिन असून या पार्श्वभूमीवर कुलगुरू वायुनंदन यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. खुल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून ३२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठात सद्यस्थितीत सहा लाख इतके विद्यार्थी असल्याने मुक्त शिक्षणाचा प्रवाह गतिमान झाला असल्याबाबत कुलगुरू वायुनंदन यांना विचारले असता, त्यांनी शिक्षणाची ही ज्ञानगंगा प्रशस्त आणि अधिक प्रदीर्घ होत जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कोरोनाच्या काळात पारंपरिक विद्यापीठांना मर्यादा आलेल्या असताना मुक्त विद्यापीठाने राज्यात शिक्षणाची गती तंत्रज्ञानाच्या बळावर कायम राखल्याचे वायुनंदन यांनी सांगितले. ऑडिओ, व्हिडिओच्या माध्यमातील शिक्षणाचा पाया आणि इस्रोच्या मदतीने अभ्यासकेंद्रे जोडून घरोघरी शिक्षण पोहोचविण्याचा विद्यापीठाचा अनुभव असून ३२ वर्षांत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करून विद्यापीठ राज्यात अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनानंतर शिक्षणातील संकल्पना बदलत आहेच, शिवाय नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुक्त तसेच पारंपरिक विद्यापीठाची संकल्पना एकसारखीच असणार आहे. त्यामुळे विद्यापीठ इतरांवर अवलंबून न राहता स्वत:ची साधनसामुग्री निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
विद्यापीठाच्या स्वमालकीची अभ्यास केंद्रे, विविध विद्याशाखा, त्यासाठी लागणारे तज्ज्ञ शिक्षक, पुस्तक निर्मिती विभाग, शिक्षकेतर कर्मचारी, अभ्यास मंडळावरील तज्ज्ञ याबाबत अन्य कोणत्याही संस्थांवर विसंबून न राहता विद्यापीठाने स्वत:ची साधनसामुग्री उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे कुलगुरू वायुनंदन यांनी सांगितले.
--इन्फो--
१) महाराष्ट्रातील पहिला व भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा ऑनलाईन पदवीदान सोहळा मुक्त विद्यापीठाने मार्च २०२१ मध्ये यशस्वीपणे घेतला. व्हर्च्युअल रिॲलिटी पद्धतीचा हा सोडला देशभर गाजला
२) मागील वर्षी सर्व परीक्षा ऑनलाईन घेणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ म्हणून बहुमान
३) नॅक ॲक्रिडेशन मिळविण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल
४) कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग एक्सलन्सी पुरस्कार दोनदा मिळविणारे एकमेव विद्यापीठ