लासलगाव : गाव, पसिरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडींचे सत्र सुरूच आहे. रविवारी होळकरनगर येथील बॅँक अधिकारी भूषण काशीनाथ राणे यांच्या बंगल्यावर निशाना साधत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टीव्ही संच यासह रोख ४६ हजार रुपये असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. या धाडसी चोरीमुळे लासलगाव परिसरातील रहिवासांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. भूषण राणे यांच्या घरी झालेल्या चोरीत २९ ग्रॅम सोन्याचे लॉकेट व पेण्डल, १७ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, २.५ ग्रॅमची कर्णफुले, चांदीची दागिने यासह रोख ४६ हजार रुपये, सतरा हजारांचा टीव्ही, ३४ हजार रुपयांचा लॅपटॉप आदी वस्तू चोरी गेल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी येथील गणेशनगर भागातील अजगर मकबूल शेख यांच्या घरी रात्री चोरी झाली. यात टीव्ही, कॅमेरा, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. दि. २२ नोव्हेंबर रोजी गणेशनगरातील भानुदास जोशी यांच्या घरी चोरी झाली. मयूर भानुदास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टीव्ही चोरीस गेला आहे. लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर असलेल्या झुआरी कंपनीचे खत दुकानाचे शटर अनोळखी इसमांनी डुप्लिकेट पटावी वापरून शटर खोलून डॉवरमध्ये ठेवलेली ८ हजार ९७३ रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. परिसरात घरफोडीचे सत्र सुरू असून, चोरांना त्वरित अटक करावी अशी मागणी होत आहे. गस्तीवर असलल्या पोलिसांनी लासलगाव स्थानिक दोन चोरांना गजाआड केले. त्याकडून टीव्ही व मोबाईल फोन जप्त करण्यात आला. भूषण सुधाकर धोदमल व रजिवान ऊर्फ पापा आयुब बागवान, रा. पिंजारगल्ली या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा एलईडी व मोबाईल संच ताब्यात घेण्यात आला.
लासलगावी घरफोड्यांचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:14 AM