सारांशयशाला गवसणी घालायची तर परिश्रमाची तयारी व कर्तृत्व असावेच लागते. ते असले की अपेक्षाही उंचावतात. पण हे सारे असतानाही नशिबाची साथ नसली तर हातचे सुटून गेल्याची रुखरुख राहणे स्वाभाविक ठरते. राज्यात भाजपची सत्ता येता येता राहिल्याने संभाव्य मंत्रिपदाला पारखे होण्याची वेळ जिल्ह्यातील या पक्षाच्या इच्छुकांवर ओढावल्याची बाबही अशीच म्हणता यावी, मात्र अशाही स्थितीत राज्यमंत्र्यांच्या समकक्ष असणारे पक्ष प्रतोदपद आमदार देवयानी फरांदे यांना लाभल्यामुळे व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी जोरकसपणे सलामी दिल्याने विरोधी बाकावरूनही अपेक्षाभंग न होण्याचा अंदाज बांधला जाणे गैर ठरू नये.महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन अधिकतर गोंधळातच पार पडले. या अधिवेशनाचा कालावधीही तसा कमीच होता. त्यामुळे त्यात नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी कोणते प्रश्न मांडले अगर जिल्ह्याच्या पदरी काय पडले, असे प्रश्न करता येऊ नयेत; मात्र एक झाले, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना भाजप आमदार प्रा. फरांदे ज्या त्वेषाने बोलताना दिसून आल्या ते पाहता विरोधी बाकावरूनही सक्षमपणे विरोधाची व प्रश्नांच्या सोडवणुकीची अपेक्षा करता यावी. राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा समावेश असल्याने सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागण्याचे आशादायी वर्तमान आहे. विधान परिषदेतील सत्ताधारी पक्षाचे आमदार हेमंत टकले यांच्याकडेही राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोदपद असल्याने त्याचाही लाभ नक्कीच संभवतो, शिवाय लवकरच होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एखाद्याला संधी लाभण्याची शक्यता आहे. पण सत्तेतील या मातब्बरांपुढे विरोधात बसावे लागलेल्यांचे काय, असा प्रश्न केला जात असताना प्रा. फरांदे यांनी हिवाळी अधिवेशनात ज्या आक्रमकपणे वक्तृत्वाची चुणूक दाखविली त्याने उभय पातळ्यांवरून अपेक्षा उंचावणे स्वाभाविक ठरले आहे.मुळात, गेल्या म्हणजे पहिल्याच ‘टर्म’मध्ये प्रा. सौ. फरांदे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याचे आडाखे बांधले जात होते. पण पक्षांतर्गत वर्चस्ववादातून तेव्हा ती संधी हुकली. यंदा दुस-यांदा त्या निवडून आल्याने व त्यांच्या मार्गातील मुख्य अडसर म्हणवणारे बाळासाहेब सानप परपक्षात जाऊन पराभूतही झाल्याने पुन्हा फरांदेंच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. अर्थात, भाजपची सत्ता आली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारात आमदार डॉ. राहुल आहेर यांना मंत्रिपदाचा जाहीर शब्द देऊन ठेवला होता हे विसरता येऊ नये; पण भाजपलाच सत्ताविन्मुख व्हावे लागल्याने सर्वच संबंधितांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले. अशा स्थितीत प्रा. सौ. फरांदेच्या वाट्यास पक्षप्रतोदपद आले हे नसे थोडके.महत्त्वाचे म्हणजे, हिवाळी अधिवेशनात बोलताना सौ. फरांदे यांनी सहा मंत्र्यांसोबत एखादी महिला शपथ का घेऊ शकली नाही, असा प्रश्न करीत हा समस्त महिलावर्गाचा अवमान असल्याचे सांगितले. गेल्या पंचवार्षिक काळात त्यांच्याच पक्षाकडून त्यांना स्वत:लाच अखेरपर्यंत मंत्रिपदासाठी ताटकळत ठेवले गेल्याची रुखरुख यामागे असेलही; परंतु सत्ताधारी महिला आमदारांची नावे घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी हा विषय मांडला त्यातून त्यांचे वक्तृत्व व नेतृत्व क्षमताही उजळून निघाल्याचे पहावयास मिळाले. नाशकातील निओ मेट्रो प्रकल्पाला आकसाने स्थगिती दिली जाऊ नये, अशी अपेक्षा करतानाच, अधिवेशनाकडे राज्यातील शेतकरी लक्ष ठेवून असल्याचे फरांदे यांनी सांगितले, हे या घटकाला सुखावणारे असले तरी, सत्तेची समीकरणे जुळवण्यात व्यस्त राहिल्याने पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला शेतकºयांच्या बांधावर कोण पोहचू शकले नव्हते, हे साºयांनीच पाहिले आहे.भुजबळांप्रमाणेच भाजपचे जिल्ह्यातील डॉ. राहुल आहेर व दिलीप बोरसे हे दोन्ही आमदारही शेता शेतात फिरताना दिसले; पण नाशकातील आमदार कुठे होते, असा प्रश्न त्यावेळीच उपस्थित केला गेला होता. त्यामुळे प्रसंग व संदर्भ बदलले की भूमिकाही बदलतात या दृष्टीने फरांदे यांच्या भाषणाकडे पाहता यावे. तथापि, नेतृत्वाच्या उजळणुकीला सत्तेपेक्षा विरोधकांचे कोंदण अधिक लाभदायी ठरते हा आजवरचा अनेकांच्या बाबतीतला अनुभव पाहता, त्यांना या अधिवेशनात लाभलेल्या चर्चेतील सहभागाच्या संधीतून जिल्ह्यातील विरोधी लोकप्रतिनिधीच्या कणखर नेतृत्वाचे प्रत्यंतर येऊन गेले व ते अपेक्षा उंचावून गेले हे मात्र नक्की.
सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी बाकावरूनही नेतृत्वाची सलामी!
By किरण अग्रवाल | Published: December 22, 2019 1:26 AM
राज्यातील नवीन सत्ताधाऱ्यांच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनातून जिल्ह्याला काही लाभले असेल तर ते इतकेच की, सत्ताधारी पक्षातील मातब्बरांबरोबरच विरोधकही आक्रमक असल्याचा प्रत्यय. त्यामुळे उभयतांचा प्रयत्न जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याकामी उपयोगी पडावा, अशी अपेक्षा बळावून जाणे अवाजवी ठरू नये.
ठळक मुद्देहिवाळी अधिवेशन पार पडले गोंधळात विरोधकांच्या नेतृत्वाची चुणूक प्रदर्शित विकासाबाबत आशादायी वर्तमान