नाशिक : जून महिन्यात वरुणराजाने उघडीप दिल्यामुळे बळीराजासह सर्वांनाच पावसाची ओढ लागली आहे. पालेभाज्या-फळभाज्या यांच्या उत्पादनासाठी जूनमध्ये आलेला पाऊस पूरक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र जून महिना संपला असून जुलै महिना सुरू झाला; मात्र अद्याप शहरासह जिल्ह्यात कोठेही वरुणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने शेतमालाची आवक बाजारात घटल्याने पालेभाज्या, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यांमध्ये पावसाने हजेरी लावणे सर्वांनाच अपेक्षित असते; मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे त्याचा परिणाम धरणामधील जलसाठ्याबरोबर विहिरींच्या पाण्याच्या पातळीवरही परिणाम झाल्याने शेतमालाच्या उत्पादनाची आवकही घटल्याने बाजारात पालेभाज्या, फळभाज्या कडाडल्या असून, सर्वसामान्यांना खरेदी करणे अवघड झाले आहे. शेपू, अंबाडी, चवळी, तांदुळका, पालक, मेथी, कोथिंबीर या सर्वच पालेभाज्यांच्या जुड्या महागल्या आहेत. बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनादेखील माल जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. तसेच पालेभाज्याच्या एका जुडीमध्ये दोन जुड्या तयार करून निम्म्या किमतीमध्ये विक्री करावी लागत आहे. मोठी जुडी महाग असल्यामुळे ग्राहक खरेदी करत नाही. सर्वच पालेभाज्यांची मोठी जुडी १५ ते २० रुपये प्रति जुडीने विक्री होत आहे, तर यामधून निम्मी भाजीची केलेली लहान जुडी दहा रुपयाने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. याचबरोबर कांदे, बटाटे, वांगे, शेवगा, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीदेखील महागली आहे. कांदे २० रुपये व बटाटे पंचवीस रुपये किलोने किरकोळ बाजारात विकले जात आहे. (प्रतिनिधी)