नाशिक : हमे त्र्यंबक जाना था, लेकिन बीच में उतार दिया अब बारा किलोमीटर कैसे जाएंगे, यह कैसी व्यवस्था है, कैसी सरकार है? असा प्रश्न करीत शासकीय यंत्रणांच्या घोळामुळे संताप व्यक्त करणाऱ्या भाविकांनी शासनाला शिव्यांची लाखोली वाहिली आणि सर्व पर्वण्या सुरळीत पार पडल्या असताना त्र्यंबकेश्वरच्या अखेरच्या पर्वणीत मात्र नाचक्कीला सामोरे जावे लागले.कुंभमेळ्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने साडेसहाशे बसगाड्यांचे नियोजन केले होते. अखेरच्या पर्वणीस भाविकांची संख्या जास्त असेल असा अगोदरच अंदाज बांधला जात होता. त्यामुळे खासगी वाहतुकीला खंबाळे, पहिने आणि अंबोली घाटात अडविण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या खंबाळे येथील वाहनतळावर गुरुवारी सकाळपासूनच खासगी मोटारी अडविण्यात आल्या होत्या. परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांनीच पुढे प्रवास करावा असे नियोजन होते; मात्र प्रत्यक्षात सारेच नियोजन बदलण्यात आले. कुंभमेळ्यातील भाविकांना त्र्यंबकजवळील सिंहस्थ बसस्थानकापर्यंत नेले जाईल असे सांगण्यात आले. परंतु दुसरीकडे मात्र खंबाळे या बाह्य वाहनतळावर प्रवाशांना सोडून अंतर्गत वाहनतळापर्यंत नेण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. परिणामी, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर अशी तब्बल बारा किलोमीटर पायपीट करावी लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कुटुंब कबिला आणि मित्र परिवारासमवेत त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पुण्य पदरी पाडून घेण्याऐवजी मनस्तापच नशिबी आला.खंबाळा येथून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची दुतर्फा रीघ लागली होती. त्यात अनेकांना किती किलोमीटर पायपीट करावी लागणार याचीही कल्पना नव्हती. अनेकांनी रस्त्यावरच ठाण मांडले. भाविकांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या महामंडळाने त्यांना पुढील मार्गदर्शन केले नव्हते, परंतु त्यापेक्षाही संतापजनक म्हणजे नाशिकहून काही बसगाड्या थेट नाशिकहून प्रवाशांनी भरून पाठविल्या जात होत्या. या बसगाड्यांच्या टपावर बसवून आणि मागील बाजूस शिडीला लोंबळकून भाविक प्रवास करीत होते. एकीकडे भाविकांना बाह्य वाहनतळावर सोडून रिकाम्या जाणाऱ्या बस आणि दुसरीकडे बसच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची होत असलेली वाहतूक यामुळे पायपीट करणाऱ्या भाविकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)
‘बीच रास्ते में छोड दिया, यह कैसी व्यवस्था है?’
By admin | Published: September 26, 2015 12:07 AM