नाशिक : येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने पूर्ण केली असून, आवर्तन सोडण्यापूर्वी गुरुवारी करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याची चोरी रोखण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, भरारी पथकही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे.मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर, साठवण बंधारा, ३८ गावे पाणीपुरवठा योजना याशिवाय निफाड तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी दरवर्षी मे महिन्यात पालखेड धरणातून पाणी सोडण्यात येते. हे शेवटचे आवर्तन असून, त्याचे पाणी साधारणत: जुलैअखेरपर्यंत संबंधितांनी पुरवायचे आहे. त्यामुळे वाटेत या पाण्याची चोरी रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न गेल्या आठ दिवसांपासून महसूल, पाटबंधारे, वीज, पोलीस खाते संयुक्तपणे करीत असून, पालखेड डाव्या कालव्यात शेतकºयांनी जमिनीखाली टाकलेले डोंगळे नष्ट करण्याची माहीत हाती घेतली आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश आल्याचा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे. त्यामुळे साधारणत: शुक्रवारी सायंकाळी पालखेडमधून अगोदर कादवा नदीमार्गे निफाडसाठी पाणी सोडण्यात येणार असून, त्यानंतर पाणी गळती रोखण्यासाठी डाव्या कालव्याच्या माध्यमातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. या काळात कालव्याच्या दुतर्फा असलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, रात्री फक्त सिंगल फेज पुरवठा सुरू ठेवण्यात येणार, तर सायंकाळी फक्त दोन तास थ्रीफेज पुरवठा केला जाणार आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहे, याशिवाय भरारी पथक कार्यान्वित ठेवण्यात आले आहे. साधारणत: ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, आजवर या पाण्याची वाटेतच चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत.
दोन हजारांहून अधिक डोंगळे नष्ट करण्यात यश,वीजपुरवठा खंडित करण्यात येणार,७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार,पाणी चोरांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई.