नाशिक : शहरासाठी दारणा धरणातून पुरेसे पाणी उचलण्यात येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आता गंगापूर धरणातून ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण
मिळावे यासाठी पुन्हा एकदा महापौरांनी सूचित केले आहे. मात्र दारणा
धरणाऐवजी समूहातून पाणी उचलण्याची परवानगी घेऊन मुकणे धरणातून तेथील
आरक्षित पाणी उचलता येणे शक्य असतानाही हा प्रस्ताव थंड बस्त्यात
ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या
कामकाजाविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
नाशिक महापालिकेला गंगापूर धरणाबरोबरच दारणा आणि मुकणे धरणातूनदेखील
आरक्षण देण्यात आले आहे. गेल्या वर्षी दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्यात आले आहे. दारणा धरणातून चेहेडी बंधारा येथून
पाण्याचा उपसा करून हे पाणी शुध्द करून नाशिकरोड विभागाला पुरवले जाते.
मात्र, काही वेळा बंधाऱ्यात वालदेवी नदीतून देवळाली कॅम्प तसेच आसपासच्या
गावांचे मलयुक्त पाणी येत असल्याने चेहेडी धरणातून पाणी उचलून त्यावर
प्रक्रिया करण्यात अडचणी येतात. गेल्या वर्षी अशाच प्रकारे दूषित
पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून दारणा नदीतील
पाणी उचलणे बंद आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून उपसा केलेले पाणीच
नाशिकरोड विभागात पुरवले जात आहे. चेहेडी बंधाऱ्यापासून मलयुक्त पाणी येत
असलेल्या भागाच्या वरील बाजूस स्वतंत्र पाइपलाइन टाकण्याची तयारी असताना
हा प्रस्ताव शासनाकडे आर्थिक मदतीसाठी प्रलंबित आहे.
त्यामुळे आता गंगापूर धरणातून तीनशे दशलक्ष घनफूट वाढीव आरक्षण मिळावे,
अशी तयारी महापालिकेने केली आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी तसे आदेश
अर्थसंकल्पीय सभेत दिले आहेत.
जलसंपदा विभागाने २००७ मध्येच पाणी वितरणाचे काेष्टक तयार केले असून,
त्यानुसार कोणत्या धरणातून किती पाणी मिळेल हे निश्चित असल्याने गंगापूर
धरणातून वाढीव पाणी मिळणे कठीण आहे. मात्र त्याऐवजी दारणा धरणाऐवजी दारणा
धरणसमूहातून पाणी मिळावे अशी मागणी करण्याबाबत प्रशासनाने चर्चा केली
हेाती. सध्या सिडकोचा काही भाग तसेच पाथर्डीसह अन्य भागाला मुकणे धरणातून
पाणीपुरवठा केला जातो. हे धरण दारणा धरणसमूहात आहे. दारणा समूहातून
पाणी देण्याची मागणी मान्य झाल्यास महापालिकेला मुकणे धरणातून हे पाणी
उचलता येईल. त्याचप्रमाणे हे पाणी विल्होळी येथून महामार्गाने समांतर
आणून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळून गांधीनगर जलकुंभाला जोडले तरी माेठे काम
हाेणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात पाणीपुरवठा
विभागाला सूचनादेखील केली आहे. मात्र तसा प्रस्ताव अद्याप सादर झालेला
नसल्याचे वृत्त आहे.
इन्फो..
महापालिकेने असा प्रस्ताव तयार करून तो मान्य केल्यास मुकणे धरणाच्या
उपसा केंद्राजवळ केवळ काही पंप वाढवावे लागतील. त्याचा खर्च फार नाही,
मात्र पाइपलाइनला खर्च येईल. अर्थात, सध्या महापालिकेने गंगापूर धरणातील
पाणी बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रावर आणल्यानंतर तेथून गांधीनगर
जलशुध्दीकरण केंद्र आणि तेथून नाशिकरोड येथे आणखी एक जलवाहिनी टाकण्याचे
नियोजन आहे. मुळातच गंगापूर धरणातून दारणा धरणात असलेले चारशे दशलक्ष
लिटर्स पाणी मिळेल किंवा नाही याची खात्री नसतानाच खर्च करण्याचा घाट सुरू आहे.