पक्षाने काढून टाकण्यापेक्षा पदे सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 01:50 AM2022-05-27T01:50:08+5:302022-05-27T01:50:43+5:30
पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ज्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडावी; अन्यथा पक्षाकडून पदावरून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पेलत नसेल तर जबाबदारीतून मुक्त होऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशा शब्दांत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्वकीयांवरच शरसंधान केले. पक्षाकडून लवकरच एक व्यक्ती एक पद तत्त्वाचा अवलंब केला जाणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.
नाशिक : पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ज्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडावी; अन्यथा पक्षाकडून पदावरून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पेलत नसेल तर जबाबदारीतून मुक्त होऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशा शब्दांत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्वकीयांवरच शरसंधान केले. पक्षाकडून लवकरच एक व्यक्ती एक पद तत्त्वाचा अवलंब केला जाणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.
नवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक जिल्हा काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २६) घेण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा दाखला देत, जिल्ह्यात पक्ष बांधणी नव्याने करण्याची वेळ आल्याचे सांगितले. अलीकडेच राबविण्यात आलेली डिजिटल सभासद नोंदणी ज्या पद्धतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात करण्यात आली त्याविषयी नाराजी व्यक्त करून पानगव्हाणे यांनी, पदाधिकाऱ्यांकडे पक्ष संघटना बांधणीसाठीच पदे देण्यात आली आहेत. परंतु त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसून येत असून, पक्षाने पदावरून दूर करण्यापेक्षा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी, देशभरात नवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून डिजिटल सभासद नोंदणी, बुथ, ब्लाॅक, जिल्हा, राज्य, देश ह्या संघटनात्मक बांधणीसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच प्रदेश पातळीवर एका शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, जिल्हा पातळीवरदेखील असे शिबिर घेण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने जिल्ह्यातही पक्ष बांधणीसाठी ७५ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार असून, त्याची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगितले. यावेळी डॉ. शोभा बच्छाव, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर माजी आमदार अनिल आहेर, प्रा. अनिल पाटील, गोपाळ लहामगे, ज्ञानेश्वर काळे, गुणवंत होळकर, बाळासाहेब कुक्कडे, रौफ कोकणी, अल्तमेश शेख, किशोर कदम, किरण जाधव तसेच ॲड. समीर देशमुख, विनायक सांगळे, समाधान पाटील, संजय जाधव, डॉ. राजेंद्र ठाकरे, सुनील आव्हाड, साखरचंद कांकरिया, प्रशांत बाविस्कर, सखाराम भोये, रमेश जाधव, विशाल जाधव, महेंद्र हिरे, दिलीप पाटील, अफजल शेख, भीमराव जेजुरे, वाळू जगताप, मुजाहिद खतिब आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन रमेश कहांडोळे यांनी केले.