नाशिक : पश्चिम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या बहुतांशी शहर भागासह ग्रामीण भागातदेखील बिबट्याचा शिरकाव वाढल्याने बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी धाव घेणाºया वनकर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे, याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. यानंतर प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत तत्काळ अद्ययावत असे दहा ‘सेफ्टी सूट’ तसेच हेल्मेटची खरेदी केल्याने रेस्क्यू पथकाला मोठा दिलासा मिळाला आहे.बिबट्याला बेशुद्ध करून पिंजºयात जेरबंद करण्यासाठी अग्रस्थानी राहणाºया वन कर्मचाºयांची सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची होती, मात्र अपुºया सुरक्षा साधनांअभावी सावरकरनगर भागात दोन कर्मचाºयांना बिबट्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत जखमी व्हावे लागले होते. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली, अन्यथा रेस्क्यू करणे जिवावर बेतले असते. वनकर्मचाºयांकडे कुठलेही सुरक्षा साहित्य नसल्यामुळे बिबट्याने पहिल्या घटनेत वनरक्षक उत्तम पाटील यांच्या तोंडावर व पाठीवर पंजा मारला होता, तर दुसºया घटनेत वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांच्यावर झडप घालून कपाळासह डोक्यावर पंजा मारून जखमी केले होते. हा हल्ला गंभीर स्वरूपाचा होता, मात्र दैव बलवत्तर असल्याने हे दोघे कर्मचारी बचावले. यानंतर बिबट्याच्या रेस्क्यू पथकामधील वनअधिकारी व कर्मचाºयांचा सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला.याबाबत तत्काळ ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी याबाबत तत्काळ दखल घेत रेस्क्यू पथकासाठी ‘सेफ्टी सूट’ खरेदी करण्याचे आदेश देत निधी उपलब्ध करून दिला. एकूण दहा सेफ्टी सूट व हेल्मेट खरेदी करण्यात आले आहे. एका सूटची किंमत सुमारे सोळा हजार तीनशे रुपये इतकी आहे. या सूटमुळे कर्मचाºयांच्या शरीराचे संपूर्णपणे संरक्षण होणार आहे.
बिबट्या रेस्क्यू पथकाला अखेर मिळाले ‘सेफ्टी सूट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:14 AM