नाशिक : बिबट्याच्या तावडीतून आपल्या चार वर्षीय मुलीची सुटका करण्यात तिच्या वडिलांना यश आले़ अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील आरोटे वस्तीवर रविवारी आठ वाजता ही घटना घडली़ बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या प्रियंका रोकडे या मुलीवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचा डोळा थोडक्यात बचावला आहे़ आजवर लबाडी, खोटेपणा केला नाही म्हणूनच देवाने नातीला जीवदान दिल्याचे या मुलीची आजी परिघाबाई सांगते अन् हे सांगताना त्यांना आपल्या डोळ्यातील अश्रू लपविणे कठीण होते़मूळचे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील पाथर्डीचे देवराम रोकडे हे पत्नी मीराबाई, दोन मुली, मुलगा आणि वृद्ध आई परिघाबाई यांच्यासह अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील आरोटे वस्तीवर ऊसतोडणीचे काम करतात़ रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे रोकडे परिवारासह ऊसतोडणीसाठी गेले़ ऊस तोडणी झाल्यानंतर ट्रक्टरमध्ये ऊस भरला, मात्र ट्रॅक्टर फसल्याने या कुटुंबाला वस्तीवर पोहोचण्यासाठी रात्रीचे आठ वाजले़ घराजवळील खड्ड्यात आणि खड्ड्याच्या वर दोन बिबटे बसलेले या परिवाराच्या लक्षातच आले नाही़ घराजवळ बसलेल्या बिबट्याला चाहूल लागल्याने तो पळाला. मात्र, खड्ड्यात बसलेल्या बिबट्याने चार वर्षांच्या प्रियंकावर झडप टाकली अन् तिला आपल्या पाठीवर टाकून ओढत घेऊन जाऊ लागला़ मुलीला बिबट्या ओढत घेऊन जात असल्याचे आई मीराबाईच्या लक्षात आले़ त्यांनी ‘पोरगी उचलली वाघाने’अशी हाक देताच देवराम रोकडे यांनी जिवाची पर्वा न करता व प्रसंगावधान राखत या बिबट्याच्या मागे धाव घेतली़ त्यामुळे बिबट्या प्रियंका सोडून पळाला़ बिबट्याच्या हल्ल्यात प्रियंकाच्या चेहरा व डोळ्याजवळ मोठी जखम झाली असून, डोळा थोडक्यात बचावला आहे़बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियंकावर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ तिच्यावर लहान मुलांच्या विभागात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)
बिबट्याच्या तावडीतून केली लेकीची सुटका
By admin | Published: December 23, 2014 12:31 AM