नाशिक : देशात फ्रीज, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि वॉशिंग मशीन महाग होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून आपल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ केली जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून या वाढीव किमती आकारल्या जाणार आहेत. चीनमधून होणाऱ्या सुट्या भागांच्या पुरवठ्यात घट झाल्यामुळे भारतातील विविध वस्तूंच्या किमतीवर परिणाम होणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रेत्यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीनमधून आयात होणाऱ्या अनेक इलेक्टॉनिक वस्तूंच्या सुट्या भागाची आयात घटली आहे. त्याचप्रमाणे चीनमधील उत्पादनावरही परिणाम झाला असल्याने जगभरातील मोठ्या ब्रॅण्डना सुट्या भागांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमतीमध्ये ४ ते ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीतील या वाढीमुळे चांगल्या दर्जाच्या उत्पादनांच्या किमतीत ३ ते ४ हजार रुपयांची वाढ होण्याची चिन्हे आहेत.
इन्फो-
दूरचित्रवाणी संचातील महत्त्वाचा घटक असलेल्या एलईडी टेलिव्हिजन पॅनेलच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे टीव्हीच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र यामुळे वस्तूंच्या मागणीत घट होण्याची शक्यता नसल्याचे उद्योगविश्वातील जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, कोरोना काळातील टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीनची सर्वाधिक मागणी नोंदवण्यात येत असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रेत्यांनी दिली आहे.
कोट-
एलईडी टीव्हीचे एलईडी पॅनल. फ्रीजचा कॉम्प्रेसर यासारख्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुट्या भागांची आयात चीनसारख्या देशातून होते. परंतु कोरोनामुळे आयातीवर परिणाम झाला असून सुट्या भागांच्या किमतीही वाढल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादन खर्चातही वाढ झाल्याने एसीसारख्या वस्तू यापूर्वीच महागल्या असून एप्रिलपासून टीव्ही, फ्रीजसारख्या वस्तूंही महागणार आहेत.
- शांताराम घंटे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा इलेक्ट्राॅनिक असोसिएशन