नाशिक : गावाचे गावपण तेथील संस्कार व संस्कृतीमुळे टिकून राहते. अशाच प्रकारे नाशिकचे गावपण टिकविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून गावाला संस्कार व संस्कृतीचा वारसा मिळत असून, या अमूल्य ठेव्यामुळेच नाशिकसारखे गाव आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे पेठे हायस्कूलच्या प्रांगणात रविवारी (दि. २२) लग्नास ५० वर्षे पूर्ण झालेल्या ५० दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मधुकर झेंडे, डॉ. अनुज तिवारी, मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, डी. एम. कुलकर्णी, रमेश डहाळे, मनीषा पगार, संजय घरटे, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते. देवयानी फरांदे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी नाशिकला संस्कार व संस्कृ तीचा अमूल्य ठेवा दिला आहे. त्यामुळेच नाशिकच्या सांकृतिक वैभवात भर पडली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात वसंतराव कोठावदे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. अन्य ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जागेवर जाऊन सन्मानित केले. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपस्थिताना उतारवयात आरोग्य निरामय राहण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल देवरे यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांचा गौरवलोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे पुंडलिकराव घरटे यांच्या स्मरणार्थ सिडकोतील शिवाजी चौक येथील नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक संघ, गंगापूररोडच्या प्रमोदनगर येथील श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व नाशिकरोडच्या गांधीनगर येथील जीवनसंध्या ज्येष्ठ नागरिक संघ या तीन ज्येष्ठ नागरी संघांचा ‘कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांकडून संस्कृतीचा वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:32 AM