नाशिक : शहरातील पथदीपांची व्यवस्था कोलमडल्याने एलईडी प्रकरणी महासभेसह स्थायी समितीत नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आयुक्तांनी एलईडीच्या ठेक्याप्रकरणी कायदेशीर बाजू तपासून पाहण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी दोन वकिलांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी पथदीपांअभावी अंधाराचे साम्राज्य असून, त्याबाबत नगरसेवक, नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रारींचा ओघ सुरूच आहे. शहरातील अनेक भागांत पथदीप बंद स्थितीत असल्याने अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना संधी मिळत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. एलईडी बसविण्याच्या ठेक्याची मुदत संपूनही अद्याप एलईडी बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी एलईडीप्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावेळी सभापती राहुल ढिकले यांनी एलईडीप्रश्नी सविस्तर माहिती देण्याचे आदेश काढले होते अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचाही इशारा दिला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महासभेतही एलईडीचा विषय गाजला होता. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काळ्या टोप्या परिधान करत सभागृहात निषेध व्यक्त केला होता आणि एलईडीचा ठेका रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एलईडीबाबत भरपूर तक्रारी प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय एलईडीचा ठेका पुढे कायम राहणार नसेल तर नेहमीच्या पद्धतीने फिटिंग्ज बसविण्याचाही विचार बोलून दाखविला होता. याचवेळी आयुक्तांनी एलईडीच्या करारनाम्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता विधी विभागाकडून कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात असून, त्यासाठी आयुक्तांनी उच्च व जिल्हा न्यायालयातील दोन वकिलांची नियुक्ती केली आहे. वकिलांकडून कायदेशीर सल्ला प्राप्त झाल्यानंतरच संबंधित ठेक्याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.
एलईडीप्रकरणी मागविला कायदेशीर सल्ला
By admin | Published: December 23, 2014 11:59 PM