सिन्नर : अनेकवेळा कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण व अत्याचार होत असतात. मात्र, पिडित समाजाच्या भीतीने सहसा तक्रार करत नाही. महिलांनी या अत्याचाराविरूद्ध निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे. यासाठी विशाखा समिती तत्परतेने मदत करते. संरक्षण मागितल्यास त्यांच्यामार्फत महिलांना न्यायालयाकडून संरक्षणदेखील मिळते, असे प्रतिपादन न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. शिरसाठ यांनी केले.तालुका विधी समितीतर्फे सिन्नर महाविद्यालयात कायदेविषयक चर्चासत्र घेण्यात आले होते. यावेळी महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण व अत्याचार या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपिठावर सहदिवाणी न्यायाधीश डी. एस. जाधव, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, अॅड. अण्णासाहेब सोनवणे, अॅड. अविष्कार गंगावणे, अॅड. ओझा, सी. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य शकुंतला गायकवाड आदी उपस्थित होते. न्या. शिरसाठ म्हणाल्या की, कायद्याच्या तरतुदीने गुन्हेगाराला शिक्षा होते. महिलांचा छळ होत असताना त्यांच्या कौटुंबिक हिंसाचाराबाबत जागरूकता ठेवा. याकरीता महिलांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. समाज काय म्हणेल या भीतीपोटी कौटुंबिक हिंसाचार झाकला जातो. या अज्ञानाच्या बाहेर कुटुंबव्यवस्थेने आणि समाजाने आता तरी जागे व्हावे जणेकरून महिलांचे शोषण होणार नाही.शासनाकडून मानहानी झालेल्या महिलांना पाच लाखापर्यंत मदतदेखील मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींचे संगोपन करताना तिला काही गोष्टींची जाणीव करून द्यावी. प्रा. डॉ. दिलीप शिंदे यांनी प्रास्तविक केले. व्ही. आर. पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शकुंतला गायकवाड यांनी आभार मानले.हुंडा प्रतिबंधक कायदा, कायद्याच्या तरतुदी, कौटुंबिक हिंसाचार, छळ, वाईट वागणूक यांची तक्रार दिली गेली पाहिजे. महिलांविषयक कायदे व हुंडाविरोधी कायदे या विषयावर सहदिवाणी न्यायाधीश डी. एस. जाधव यांनी मार्गदर्शन केले.
सिन्नर महाविद्यालयात कायदेविषयक चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 6:24 PM