नाशिक : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने होमक्वारंटाइन असलेले जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातील कामकाज आपल्या निवास्थानातूनच पूर्ण केले. गेल्या शनिवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते घरातूनच ऑफिस ॲटोमेशनच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजदेखील करीत आहेत. शनिवारी सकाळी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच क्वारंटाइन झाले आहेत. याच दरम्यान सोमवारपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू झाल्याने विधिमंडळाशी संबंधित तातडीचे संदर्भ आदी कामकाज त्यांनी टॅबलेटवरून करीत प्रशासकीय कामकाजाला सहकार्य केले.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते तात्पुरता कार्यभार अपर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवतील असे बोलले जात होते. परंतु त्यांनी होमक्वारंटाइन असताना घरातूनच कामकाजाला सुरुवात केली. ऑफिस ऑटोमेशनचा खरा फायदा आता होत असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्वत: कळविले आहे. जिल्हा नियोजन समितीचे संपूर्ण कामकाज आयपास प्रणालीद्वारे चालते. त्यामुळे सगळ्या मान्यता टॅबलेटवरूनच देऊ शकत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
--कोट--
डीपीसी, न्यायालयीन प्रकरणे, विधिमंडळाचे तातडीचे संदर्भ आणि इतर काम संचिकांना स्पर्श न करताही गतीने पूर्ण करता आले. या तंत्रज्ञानामुळे सहज कामकाज करणे साध्य झाले आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी