सुनील शिंदे ल्ल घोटीइगतपुरी तालुक्यातील पाच गटांपैकी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या झालेल्या वाडीवऱ्हे गटात यंदाच्या निवडणुकीत काट्याची लढत होणार असल्याने या गटाच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. हा गट काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी आमदार निर्मला गावित यांनी कन्या नयना गावित यांना रिंगणात उतरवत चुरस निर्माण केली आहे.काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे सर्वेसर्वा समजले जाणारे स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पश्चात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या गटातील मतदारांनी त्यांचे चिरंजीव संदीप गुळवे यांना संधी दिली होती. त्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे संदीप गुळवे हे या गटातील काँग्रेसचेच सभापती गोपाळ लहांगे यांना सोबत घेऊन शिवसेनेत गेले. मात्र गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने या गटातून गोपाळ लहांगे यांच्या पत्नी अनिता लहांगे हे शिवसेनेकडून दावेदार ठरल्या. यामुळे या गटात चार राजकीय पक्षांसह, एक अपक्ष रिंगणात असले तरी खरी लढत काँग्रेस आणि शिवसेनेतच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.वाडीवऱ्हे आणि नांदगाव बु।। या दोन गणांचा समावेश असलेल्या या गटाचा विस्तार मोठा असून, सिन्नर मतदारसंघातील गावांचा या गटात समावेश आहे. मात्र मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल असा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याने काँग्रेस पक्षाने सर्वात जास्त ताकद या गटात लावली आहे. काँग्रेस, भाजपा, माकप वगळून इतर सर्व पक्ष काँग्रेसच्या विरोधात एकटवले असल्याचे चित्र या गटात पाहण्यास मिळते. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला नसल्याने तसेच वाडीवऱ्हे गणातून मनसे व राष्ट्रवादी आणि नांदगाव बु।। गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या गटातून काँग्रेसच्या नयना गावित, शिवसेनेकडून अनिता लहांगे, भाजपाकडून गीता लहांगे, माकपकडून कुसूम बेंडकुळे यांच्यात लढत होत असली तरी मनसे आणि राष्ट्रवादीने उमेदवार उभे न केल्याने याचा फायदा कोणाला होतो, याकडे लक्ष लागले आहे.
आमदार कन्येच्या उमेदवारीने लक्षवेधी लढत
By admin | Published: February 16, 2017 12:14 AM