नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुद्द्यावर प्रारंभी आक्रमक भूमिका मांडणाऱ्या भाजपा आमदारांनी याप्रकरणी सध्या नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निदान या प्रकरणाकडे लक्ष तरी वेधले; मात्र अपेक्षित पाठपुरावा न झाल्यामुळे विभाजनाची दुसरी समितीदेखील नियुक्त झाली आहे. आता तर या मुद्द्यावर कुणी बोलायलाही तयार नसल्याने नाशिकचे विद्यापीठ वाचविण्यासाठी येथील विद्यापीठ बचाव कृती समितीला धावाधाव करावी लागत आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून नागपूरला आयुष विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार आयुर्वेदातील डॉक्टरांची एक समिती गठीत करून त्यांना विद्यापीठासाठी थेट जागेचा शोध घेण्याचे सांगण्यात आल्याने विभाजनाचा मुद्दा गांभीर्याने घेण्यात आल्याची बाब समोर आली होती. या समितीने सुमारे ७० एकर जागेचा अहवाल शासनाला दिल्यानंतर याप्रकरणी विद्यापीठातील कर्मचारी खडबडून जागे झाले. त्यांनी तातडीने कृती समिती तयार करून विद्यापीठ वाचविण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या. या संदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिकमधील भाजपा आमदारांनी याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विद्यापीठाचे विभाजन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन होण्याबाबत माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांनी केलेले प्रयत्न पाहता कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाचे विभाजन होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका आमदारांनी मांडली होती. आमदार देवयानी फरांदे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभाजनाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आश्वासन फरांदे यांना दिले होते. आमदार राहुल अहेर यांनी तर याप्रकरणी विद्यापीठ जात नाही तर केवळ विभाजन होत असल्याने विद्यापीठाला धोका नसल्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. दहा-बारा दिवस उलटत नाही तोच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी एक बैठक घेऊन आयुष विद्यापीठाबाबत आणखी एक समिती स्थापन केली. या समितीने विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या तांत्रिक बाजूंची माहिती द्यावी असे ठरविण्यात आल्याने शासनाने विद्यापीठ विभाजनाबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकलेले असताना नाशिकमधील भाजपा आमदारांना याचा पत्ताही लागला नाही. काल-परवापर्यंत मुख्यमंत्र्यांना भेटण्याची भाषा करणारे इतर आमदार मात्र अजूनही याप्रकरणी मौन बाळगून आहेत. (प्रतिनिधी)
विद्यापीठ विभाजन मुद्द्यावर आमदार अपयशी
By admin | Published: February 17, 2016 11:51 PM