लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यापासून बचावासाठी सर्वतोपरि खबरदारी प्रशासकीय पातळीवर घेतली जात असतानाही काही नागरिकांकडून अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी काही अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वत:च आवारात झालेली विनाकारण गर्दी हटविली. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच प्रत्येकाला जिल्हा परिषदेत येण्याचे कारणांची विचारणा सुरू केल्याने अनेकांनी मागच्या बाजुने काढता पाय घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारीच नाशिक जिल्हा परिषदेने अभ्यागतांना कोणत्याही कामकाजासाठी थेट जिल्हा परिषदेत न येता ई-मेल द्वारे तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यामागे जिल्हा परिषदेच्या आवारात तसेच खाते प्रमुखांच्या कार्यालयातील गर्दी कमी करण्याचे व कोरोनाला प्रतिबंध करण्याचा हेतू होता. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच अधिका-यांना कोरोनापासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच गावोगावी घ्यावयाची खबरदारी तसेच प्रशासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती दिली होती. प्रशासनाकडून करण्यात येणा-या या उपाययोजनांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेत मंगळवारी नेहमी प्रमाणेच अभ्यागतांची व ठेकेदारांची गर्दी झाली. खुद्द मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनाबाहेरही त्यांच्या भेटीसाठी अनेक जण ताटकळल्याचे तर आवारातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळही ठेकेदार घोळके करून जागोजागी उभे होते. जितकी गर्दी आवारात तितकीच गर्दी बांधकाम विभाग क्रमांक एकच्या कार्यालयात होती. त्यातच शासकीय कामकाजासाठी तालुक्यातून आलेल्या काही कर्मचा-यांचाही समावेश होता. याच दरम्यान, दुपारी चार वाजेच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे जिल्हा परिषदेत आगमन होताच, त्यांनी उपस्थित गर्दी पाहून आश्चर्य व तितकाच संताप व्यक्त केला. बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी स्वत: पुढाकार घेत, प्रत्येकाला जिल्हा परिषदेत येण्याचा जाब विचारण्यास सुरूवात केली व अनेकांना अक्षरश: आवारातून हुसकाविले. सुमारे पंधरा ते वीस मिनीटे आवारात उभे राहून मुख्य कार्यकारी अधिका-यांनी विनाकारण गर्दी करून असलेल्यांना बाहेर घालविले. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या आवारात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. बनसोड यांच्या धाकाने दुपारनंतर चहापानासाठी कार्यालय सोडणा-या कर्मचा-यांनीही जागेवरच बसणे पसंत केले.