नाशिकरोड : चाडेगाव मानकर वस्ती येथे घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.चाडेगाव व आजूबाजूच्या मळे परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून ग्रामस्थ व शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे बोलले जात होते. चाडेगाव रोडवरील मानकर वस्ती येथे अॅड. गणेश मानकर यांच्या घराबाहेरील पाळीव कुत्र्यावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केले. सदर बाब शनिवारी सकाळी मानकर कुटुंबीयांच्या लक्षात येताच सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. शनिवारी वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. यामुळे परिसरातील ग्रामस्थ व मळेकरी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच चाडेगाव शिवारात पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला होता.
चाडेगाव परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:34 AM