निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. नांदूरमधमेश्वर धरणावरवरील स्त्यावर पंढरीनाथ विठ्ठल गाजरे हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराबाहेर तीन शेळ्या बांधलेल्या होत्या. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करीत तीनही शेळ्यांना ठार केले . सकाळी ही घटना गाजरे यांच्या लक्षात आली त्यांनी पाहिले असता तिन्ही शेळ्या त्यांच्या घरापासून वीस ते तीस, तीस ते पन्नास मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळल्या. सदरची घटना पोलीस पाटील डांगळे यांनी येवला वन विभागाला कळवली. येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख, वनमजूर भारत माळी यांचे पथक गाजरे यांच्या वस्तीवर पोहोचले व या घटनेचा पंचनामा केला. वीस दिवसांपूर्वी गाजरे यांच्या वस्तीपासून जवळच असलेल्या आदिनाथ गाजरे यांची एक शेळी बिबट्याने ठार केली होती. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने गाजरे यांच्या शेतात पिंजरा लावला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 3:10 PM