नाशिक: घराच्या आवारात बसलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या मुंगासरे गावात रहिवासी भागामध्ये बिबट्याचा धुडगूस पहायला मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ ट्विट करुन बिबट्याच्या हल्ल्याची माहिती दिली.
शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये कुत्रा अंगणात बसल्याचे दिसत आहे. काही सेकंदात तिथे बिबट्या धावत येतो, बिबट्याला पाहून घाबरलेला कुत्रा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण, तेवढ्यात बिबट्या त्याला आपल्या जबड्यात पकडून नेतो. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची ही घटना घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे. आज कुत्र्यावर तर उद्या माणसावर हल्ला होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून गावात आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या बिबच्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, नाशिकचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.