नाशिक : इंदिरानगर परिसरातील राजसारथी गृहनिर्माण सोसायटी मध्ये बिबट्याने प्रवेश करत दोघांना जखमी केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर काही वेळेतच वन विभागाचे रिस्की पथक व इंद्रानगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान परिसरात बिबट्या झाल्याच्या घटनेने रहिवाशांमध्ये घाबरट निर्माण झाली. नागरिकांनी आपली दारे खिडक्या बंद करून घेतात घरामध्ये सुरक्षित आश्रय घेतला. वन विभागाच्या पथकाकडून संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. राज सारथी सोसायटीमधील b12 विंगमध्ये बिबट्या सर्वप्रथम शिरला. येथे जिन्यामध्ये बिबट्याने सूपडु लक्ष्मण आहेर या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जिन्याने खाली आला आणि सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरून पुढे जात दुसऱ्या एका इसमावर हल्ला चढविला. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आहेर हे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या इसमास किरकोळ जखम झाली आहे.
बिबटया येथील दत्त मंदिर च्या दिशेने जाताना कॅमेऱ्यात दिसतो. मात्र तेथून पुढच्या कॅमेऱ्यात बिबटया कैद झाला नाही. यावरून बिबट्याने सोसायटीच्या मागील बाजूने झेप घेत वाडाळ्याच्या दिशेने नाल्याकडे धूम ठोकली असावी, असा अंदाज वनविभागाच्या पथकाने व्यक्त केला आहे. परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा ही आढळून आल्या आहेत. तत्पुर्वी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील एका रुग्णालयाच्या सुरक्षा राक्षकास बिबटया पळताना नजरेस पडला होता.