नाशिक: तालुक्यातील दारणा नदीकाठालगतच्या चाडेगाव शिवारातील एका मळ्याच्या बांधाभोवती वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि.२४) पहाटे प्रौढ बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याचा मागील काही दिवसांपासून येथील मळे परिसरात मुक्त संचार वाढला होता. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाचीही हानी झाली होती. यामुळे आता येथील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दारणा नदीच्या काठालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा संचार नवीन नाही. दोन वर्षांपूर्वी येथील विविध गावांमध्ये बिबट्यांचे चार ते पाच मानवी हल्ले झाले होते. या भागातील गावांमध्ये बिबट्यांच्या संचाराची तक्रार काही प्रमाणात कमी झाली होती; मात्र लहान पिल्ले आता दोन ते चार वर्षांची झाल्याने पुन्हा एकदा चाडेगाव, एकलहरे, जाखोरी, पळसे, संसारी, बेलतगव्हाण, दोनवाडे, भगूर, लहवित आदी गावांमध्ये बिबट्यांचा संचार वाढू लागल्याचे ग्रामस्थ सांगतात.
गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात अवघ्या पाचच दिवसांत बिबट्या अडकला. हा बिबट्या नर असून सुमारे सात ते आठ वर्षांचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे समजताच लोकवस्तीवरील रहिवाशांनी व तरुणांनी त्याला बघण्यासाठी पिंजऱ्याभोवती गर्दी केली होती. माहिती मिळताच वन पथकाने धाव घेत सुरक्षितरीत्या पिंजरा वाहनात टाकून घटनास्थळावरून हलविला. बिबट्याची प्रकृती सुदृढ असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त सोडण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.