भगुर : भगुरनजिकच्या दारणा पंपीग लहवितरोड येथील पेरूच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात गेल्या काही महिन्यांपासून अनेक बिबटे फिरत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, या भागात अजूनही बिबट्यांचे वास्तव्य कायम असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी पिंजरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे. भगुर दारणा नदीच्या काठावरील दारणा पंपीगरोडचे परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल व मुबलक पाणी उपलब्ध असून, अनेक शेतकऱ्यांची बागायती शेतीही आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांना भक्ष्य व पाणी तसेच लपण्यासाठी पुरेपूर जागा आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून नर, मादी व दोन बछड्यांसह बिबट्यांचा मुक्त वावर असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. दिवसाढवळ्या बिबटे फिरत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकामावरही परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी सायंकाळी याठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे वन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी वन विभागाने नारायण पाटील या शेतकऱ्याच्या पेरूच्या बागेत पिंजरा लावला होता. मध्यरात्री केव्हा तरी भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. जेरबंद झाल्यानंतर बिबट्याने डरकाळ्या फोडल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. याबाबत तत्काळ वन विभागाला कळविण्यात आले. वन अधिकारी विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन बिबट्याला पिंजऱ्यासह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या भागात अजूनही बिबट्यांचे वास्तव्य कायम असून, याठिकाणी कायमस्वरूपी पिंजरा लावण्याची मागणी बाळासाहेब कासार, मोहनराव करंजकर, राहुल थोरात, अमित कातकाडे, लक्ष्मण देशमुख, रत्नाकर मोहिते, भगवान कापसे, चंद्रकांत मोहिते, तानाजी करंजकर नारायण पाटील यांनी केली आहे.
( फोटो २६ बिबट्या) - भगुरला दारणा पंपीगरोड येथील शेतात बिबट्या जेरबंद झाला.