इंदिरानगर : येथील पाथर्डी गावापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर गौळाणे रस्त्याला लागून असलेल्या यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यातील एका उसाच्या शेतात तोडणीदरम्यान बिबट्याचा एक बछडा कामगारांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक वन्यजीवप्रेमींसह मळ्यात दाखल झाले.गौळाणे रस्त्यालगत यशवंतनगरचा मळे परिसर आहे. येथील कोंबडे मळ्यात एका नैसर्गिक नाल्यावरील बाजूस असलेल्या ऊसशेतीमध्ये ऊसतोडणी नेहमीप्रमाणे सुरू होती. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात कामगार ऊसतोड करत असताना शेतात त्यांना बछडा नजरेस पडला. याबाबतची माहिती त्यांनी शेतीमालक संजय शिवाजी कोंबडे यांना दिली. त्यांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाच्या कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संपर्क साधून याबाबत कळविल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले. माहिती मिळताच वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, रोहिणी पाटील, विजय पाटील, इको-एको फाउण्डेशन या वन्यजीवप्रेमी संस्थेचे वैभव भोगले, प्रथमेश पाटील यांनी घटनास्थळ गाठले. बछडा अगदी सुस्थितीत पूर्णपणे सुदृढ असल्याचे लक्षात येताच त्याला वन्यजीवप्रेमींनी बास्केटमध्ये कडुनिंबाचा पाला टाकून त्यामध्ये ठेवले. हा बछडा सुमारे तीन आठवड्यांचा असून, मादी असल्याची माहिती गोसावी यांनी दिली.-----------------------माय-लेकाची भेट घालून देण्याचा प्रयोगकोंबडे मळ्यात इको-एको फाउण्डेशनच्या मदतीने वनविभागाकडून आढळून आलेल्या तीन आठवड्यांच्या या बछड्याची पुन्हा मादीसोबत पुनर्भेट घालून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील मळ्यात सुरक्षितपणे बछड्याला संध्याकाळी ५ वाजता ठेवण्यात आले आणि ३६० अंशांत फिरणाऱ्या कॅमेºयाद्वारे त्यावर नजर ठेवून मादीची आपल्या बछड्यासोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत केला जात होता.
ऊसशेतीत आढळला बिबट्याचा बछडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 10:27 PM