नाशिक : दिंडोरी तालुक्यातील उमराळे वन परिमंडळाच्या मोहाडी गावाच्या शिवारात एका ऊसशेतीच्या बांधालगत चार महिन्यांचा बिबट्याचा बछडा(मादी) अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. बछड्याला पूर्व वनविभागाचे कर्मचारी व इको एको वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रविवारी (दि.२५ रात्री धाव घेत सुखरूपपणे रेस्क्यू केले. बछड्याला गॅस्ट्रोसदृश्य आजार झाल्याचे निदान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
मोहाडीत बिबट्याच्या मादीचा वावर आहे. ज्या शेतात हा बछडा आढळून आला तेथे अगदी कमी स्वरूपात ऊसशेती आहे. ‘एचएएल’च्या परिसरातील गवताळ भागात बिबट्याला लपण उपलब्ध आहे. या ठिकाणी बिबट्याची मादी आपल्या पिल्लांना घेऊन यापूर्वी आश्रयाला असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे; मात्र काही दिवसांपूर्वीच तिने आपली जागा बदलून ऊसशेतीत स्थलांतर केले असण्याची शक्यता वनविभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास माणिक देशमुख यांच्या शेतात ऊसशेतीमधून ३ ते ४ महिन्यांचा एक बछडा अचानकपणे बाहेर येऊन शेतात पडला. ही बाब येथील रहिवासी युवकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. काही वेळेतच वनपाल वैभव गायकवाड, वनरक्षक गोरख गंगोडे, शांताराम शिरसाट, चेतन गवळी तसेच मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले वन्यजीवप्रेमी सागर कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्यवस्थ बछड्याला सुरक्षित रेस्क्यू करत तत्काळ नाशिकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ.सोनवणे, पवार यांनी उपचार सुरू केले. बछड्यावर औषधोपचार केला जात असून अतिसारामुळे त्यास अशक्तपणा आला असल्याचे पशुवैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
----
फोटो nsk वर पाठविले आहेत.