नाशिक : भगूरपासूनजवळच असलेल्या राहुरी शिवारातील सांगळे वस्तीलगत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी एका बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत बछड्याचे शव ताब्यात घेतले.
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांमध्ये सध्या ऊसतोड सुरू झाली आहे. यामुळे बिबटे सैरभैर होऊ लागले आहे. राहुरी गावालगत असलेल्या सांगळे वस्तीवरील सुरेशनगर भागात मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका भरधाव जाणाऱ्या वाहनाने बछड्याला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बछडा जागीच गतप्राण झाला. या बछड्याचे वय अंदाजे दोन ते अडीच महिने असावे, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. बिबट्यांची बछडे तसेच नर, मादींची भटकंंती वाढल्याचे निदर्शनास येत आहे. नाशिक पश्चिम वनविभागाच्या रात्रीच्या दक्षता पथकाला याबाबत तक्रारी प्राप्त होत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.