भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर असुरक्षिततेची जाणीव झाल्याने मादी-नवजात बछड्यांची ताटातूट झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. नाशिक पश्चिमच्या हद्दीत भगूरजवळील वडनेर येथील पोरजे यांच्या शेतमळ्यात बुधवारी दुपारी ऊस कापणी पूर्ण करण्यात आली. यावेळी उसाच्या चिपाडाखाली बिबट्यांचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना नजरेस पडले. त्यांनी तत्काळ ही बाब शेती मालकाला सांगितली. पोरजे यांनी वनविभागाला माहिती कळविली. तत्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछड्यांची पाहणी करुन ते उपाशीपोटी तर नाही ना याचा अंदाज लावण्यात आला. ते सुदृढ असल्याची खात्री पटल्यानंतर पुन्हा जैसे थे पद्धतीने बछड्यांना शेतात सुरक्षित ठेवण्यात आले. तसेच मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी ऊस शेतीचा संपूर्ण परिसर वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी निर्मनुष्य केला. तसेच संध्याकाळनंतर कोणीही या भागात घराबाहेर पडू नये, आपली लहान मुले, पाळीव प्राण्यांना सुरक्षितपणे बंदिस्त जागेत ठेवण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात आले.
अंधार पडल्यापासून बराचवेळ मादी बिबट बछड्याच्या जवळपास आल्याचे कॅमेऱ्यात दिसलेले नव्हते. या ठिकाणी ३६० अंशात फिरणारा डिजिटल कॅमेरा बसविण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हालचालींवर रात्रभर वनकर्मचारी लक्ष ठेवून होते.
----
फोटो nsk वर सेंड केला आहे.