निफाड : शहरापासून अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावर एका शेतात असलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले. काही दिवसांपासून गायी, गुरे, बकऱ्यांचा फडशा पाडला जात होता़ याला आता अटकाव बसणार आहे़ जिल्ह्यात इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातही बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. निफाडपासून सोनेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरेश छगन कुंदे यांची द्राक्षबाग आहे. या परिसरात बिबट्याने महिन्यापासून दहशत निर्माण केली होती. शेतवस्तीतील काही कुत्र्यांचा फडशाही त्याने पडला होता.परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याची मादी व दोन बछडेही नजरेस पडले होते. नागरिकांनी ही बातमी वन विभागास दिल्यानंतर सुरेश छगन कुंदे यांच्या द्राक्षबागेत पिंजरा लावण्यात आला होता. रविवारी सकाळी सुनील कुंदे यांना या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसले. यांनी ही बातमी तत्काळ येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे, वनपाल टी. डी. भोये, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वनकर्मचारी डी. आर. पगारे, लोंढे, अहिरे आदिंनी कुंदे यांच्या शेताकडे धाव घेतली. जेरबंद बिबट्याची रवानगी नाशिक येथे करण्यात आली. जेरबंद बिबट्या हा सहा ते सात वर्ष वयाचा आहे. सोनेवाडी रोड परिसरात अजून बिबट्याची मादी व तिचे दोन बछड्याचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. वन विभागाकडून परत सोमवारी (दि. २९) या परिसरातील शेतात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
निफाडजवळ बिबट्या पकडला
By admin | Published: February 28, 2016 11:56 PM