निफाड : तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे मंगळवारी, दि. ११ रोजीच्या पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
ब्राह्मणवाडे येथील संपतगिरी काशीगिरी गोसावी यांच्या शेत परिसरात बिबट्याने वारंवार दर्शन दिल्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली होती. वन विभागाने गोसावी यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दि. ४ मे रोजी पिंजरा लावला होता. मंगळवारी, दि. ११ रोजीच्या पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
हा मादी बिबट्या अंदाजे तीन ते चार वर्षांचा आहे. वनविभागाचे वनपाल भगवान जाधव, वनरक्षक सुनील महाले व वनसेवक भय्या शेख, वनमजूर भरत माळी, विजय माळी, नानासाहेब रेहेरे, बुरुख आदींच्या पथकाने पिंजऱ्यात जेरबंद केलेल्या मादी बिबट्याला वनविभागाच्या वाहनाने निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. या ठिकाणी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. रवींद्र चांदोरे यांनी सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. बिबट्या जेरबंद झाल्याने ब्राह्मणवाडे येथील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. (११ निफाड)