सायखेडा : निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले दारणासांगवी येथे बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. खंडू दगू करपे यांच्या शेतातील गट नंबर ३४३ येथे पिंजरा लावला होता. त्यात अंदाजे पाच वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला असून त्यास वनविभागातील कर्मचाऱ्यांनी निफाड येथील शासकीय रोपवाटिकेत आणले आहे.हिंगणवेढे येथे लहान मुला बिबट्याने हल्ला केला ही घटना ताजी असतानाच हिंगणवेढे जवळच असणाºया दारणासांगवी गावात बिबट्याचा मुक्त संचार होता. हिंगणवेढे आणि दारणा सांगवी या दोन्ही गावांच्यामध्ये फक्त गोदावरी नदी आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला वास्तव्यासाठी अनुकूल जागा असल्याने या ठिकाणी अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार होता. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काम करत असताना बिबट्याला पाहिले होते. मजुरांना देखील बिबट्या दर्शन वारंवार झाले होते. ग्रामपंचायतमार्फत वनविभागाचे कर्मचारी यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार दोन दिवसापूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजरत सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक अडकला.सदर बिबट्याचा उजव्या बाजूला छोटीशी जखम झाली आहे. यावेळी वनविभाग अधिकारी संजय भंडार, वन क्षेत्रपाल तुषार चव्हाण सुजित डोमसे यासह कर्मचारी उपस्थित होते
दारणासांगवी येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 3:47 PM