घोटी (नाशिक) - धामणगावातील एका घरात बिबट्या घुसल्याची घटना समोर आली आहे. या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे. मंगळवारी (14 ऑगस्ट) पहाटे चार वाजता अचानक बिबट्याचे 3 महिन्याचे पिल्लू गावातील एका घरात घुसून लहानमुलांसोबत मच्छरदाणीत जाऊन झोपल्याचा प्रकार समोर आला. महिन्याभरात गावातील घरांमध्ये बिबट्या शिरल्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले. गेल्या महिन्यात याच गावात विहिरीत बिबट्या पडला होता तर दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या झोपडीत सापडला होता. दरम्यान बिबट्या दिसण्याचे प्रमाण वाढले असून वन खात्याने आवश्यक उपाय करावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.
धामणगाव येथे मनीषा बर्डे यांचे आदिवासी कुटुंब पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत राहते. मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास प्रातविधीसाठीसाठी दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असलेले बिबट्याचे ३ महिन्याचे पिल्लू घरात घुसले .मात्र याबाबत त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. घरात बर्डे यांची दोन मुले मच्छरदाणीत झोपलेल होते. बिबट्याही मुलांच्या बिछान्यात अलगद प्रवेश करून तो झोपी गेला. हा संपूर्ण प्रकार पहाटे 5 वाजता मनीषा यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना संपर्क करून माहिती दिली.
इगतपुरीचे वन परिक्षेत्राधिकारी आर. पी. ढोमसे यांचे मार्गदर्शन घेऊन वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्यासह धाव घेऊन जाळ्यांच्या साहाय्याने बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. कमी वयाचे पिल्लू असले तरी लहान बालकांना इजा करण्याइतपत त्याच्यात क्षमता असते असे त्यांनी सांगितले. दरम्यान इगतपुरी तालुक्यात बिबट्या दिसण्याचे आणि सापडण्याच्या घटना वाढल्या आहेत. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी बिबट्या मारून तस्करी करणारी टोळी उघडकीस आणली होती. यासह अनेक घटनांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे.
बिछान्यात बिबट्याचे पिल्लू असल्याचे समजताच १५ मिनिटांत दखल घेऊन त्याला ताब्यात घेतले. बिबट्या मानवी जीवनासाठी घातक नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.- गोरक्षनाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी