नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारातील रायगडनगरजवळ भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेली अडीच वर्षांची प्रौढ बिबट मादी जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.७) मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली.मुंबई-आग्रा महामार्ग माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांच्याही जीवावर बेतत आहे. महामार्गावरील वेगमर्यादेचे वाहनचालकांकडून उल्लंघन होत असल्याने अपघातांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून येत असले तरी त्याचे अस्तित्व संकटात सापडले आहे. या पंधरवड्यात तीन बिबटे विविध कारणाने मृत्यूमुखी पडले. यामध्ये एका बछड्याचाही समावेश आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर चुंचाळे खत प्रकल्प ते थेट इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर आढळतो. या भागात बिबट्यांचा महामार्गाच्या दुतर्फा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होतात. नाशिक पश्चिम वनविभागाकडून महामार्गावर ठळक अक्षरात बिबट संवर्धनाच्या दृष्टीने सचित्र सुचनाफलक लावणे गरजेचे आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनदेखील दुर्लक्ष होत असल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चमध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून नाशिककडे जाणा-या भरधाव अज्ञात वाहनाने मादिला धडक दिली. या धडकेत मादीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर काही जागरूक वाहनचालकांनी नाशिकच्या शहर पोलीस नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून तत्काळ नाशिक पश्चिम विभागाचे वनपाल मधुकर गोसावी यांना अपघाताबद्दल माहिती दिली गेली. माहिती मिळताच गोसावी हे त्यांच्या वनरक्षकांसह घटनास्थळी काही वेळेत पोहचले. बिबट मादीचा मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला. गुरूवारी सकाळी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर गंगापूर रोपवाटिकेत मृतदेहाचे दहन करण्यात आले.
रायगडनगरला महामार्गावर बिबट मादी अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 5:16 PM
मुंबई-आग्रा महामार्गावर चुंचाळे खत प्रकल्प ते थेट इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर आढळतो. या भागात बिबट्यांचा महामार्गाच्या दुतर्फा नैसर्गिक अधिवास आहे.
ठळक मुद्देगंगापूर रोपवाटिकेत मृतदेहाचे दहन बिबट्याची मादी रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक