देवळाली कॅम्प : महिनाभरापासून साऊथ देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात रात्री जेरबंद झाला़ साऊथ देवळाली परिसरातील जंगलात वन विभागाने जंगल बचाव मोहिमेअंतर्गत बिबटे सोडले असून, ते भक्ष्य व पाण्याच्या शोधात थेट नागरी वस्तीकडे येत आहेत़ बार्न्स स्कूल परिसर हा डोंगर नाल्याचा तसेच हिरवाईने नटलेला परिसर आहे़ दारणाकाठच्या भागातून या ठिकाणी बिबट्यांचे कायम वास्तव्य आढळून येते़ तीन महिन्यांपूर्वी एक बिबट्या शाळेलगत लावलेल्या पिंजऱ्यात अडकला होता़ यानंतर महिनाभरापासून पुन्हा येथील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत होते़ तशी तक्रार शेतकरी तसेच शाळा प्रशासनाने वन विभागाकडे केली होती़ यानंतर गेल्या आठ दिवसांपासून वन विभागाने पिंजरा लावला होता़ भक्ष्याच्या शोधात आलेला नर बिबट्या अलगद यामध्ये अडकला़ बिबट्याने फोडलेल्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता़ वनपरिक्षेत्र अधिकारी राजन गायकवाड, वनरक्षक उत्तम पाटील यांनी रात्री अकरा वाजता त्यास पिंजऱ्यासह गंगापूर डॅमजवळील वन विभागाच्या परिसरात हलवले़
बिबट्या अखेर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद
By admin | Published: December 05, 2014 1:37 AM