ॅसिडको : शहरातील अंबड औद्यागिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत शुक्रवारी सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने बिबट्याच्या बछड्यास जेरबंद केले. कंपनीच्या जीआयएस शॉपमध्ये सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास २० ते २५ कामगार कामासाठी गेले असता गणेश या कामगारास शॉपमध्ये बिबट्याचा बछडा बसलेला दिसला. त्याने सर्व कामगारांना शॉपमध्ये बिबट्या असल्याचे सांगितले व काही वेळातच येथील सर्व कामगार तेथून बाहेर पडले. कंपनी व्यवस्थापनाने तातडीने वनविभाग तसेच अंबड पोलिसांना कळवून बिबट्या असलेल्या शॉपचे दोन्ही बाजूंकडील शटर बंद करून घेतले. बिबट्याचे बछडे हे कंपनीच्या अत्यंत अडगळीच्या जागेवर लपलेले असल्याने त्यास पकडणे वनविभागाला अवघड झाले होते. बिबट्याला ट्रॅन्क्यिलायझर गनच्या सहाय्याने बेशुद्ध करण्यात आले. पहिला प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात बछडा बेशुद्ध झाला. बछडा ७ ते ८ महिन्यांचा व अंदाजे ३५ ते ४० किलो वजनाचा असण्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला. वनविभागाच्या सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बछड्यास जेरबंद करण्यात यश आले. (वार्ताहर)
क्रॉम्प्टन कंपनीत आढळला बिबट्या
By admin | Published: February 19, 2016 10:40 PM