खामखेडा : गावशिवारात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी खामखेडा ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समतिीच्या वतीने तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.खामखेडा गावाच्या उत्तरेस डोंगररांगा असून पिळकोस गावाच्या सीमेपासून पासून सावकीच्या हद्दीपर्यंत गावाला लागून डोंगरांगा आहेत.चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने जंगलात (डोंगरात) वन्यजीवांना पिण्यासाठी पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याने व त्याचबरोबर वन्य जीवांना खाद्य नसल्याने या जंगलात असलेले बिबट्या व अन्य वन्यजीव नागरी वस्तीत येऊ लागल्याने व डोंगरांमधून बिबट्या थेट मानवी वस्तीत दिवसाही दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मागील काही दिवसात बिबट्याने शेतकरी तसेच मेंढपाळ बांधवांच्या प्राण्यांवर हल्ला चढवत नुकसान केले आहे. त्याचबरोबर गिरणा नदी काठावरील भऊर तसेच खामखेडा गावाच्या पश्चिमेकडील कसाड शिवारात मोठ्या प्रमाणावर बिबट्याने प्राण्यांवर हल्ले तसेच मानवी वस्तीत भर दिवसा दर्शन देत असल्याने मानवी वस्तीत या प्राण्यांचा वावर वाढल्याने माणसांवर देखील हल्ले करण्याची भीती नागरिकांना वाटु लागली आहे. वनविभागाच्या मार्फत खामखेडा गावाच्या उत्तरेकडील डोंगररांगांना लागून मांगबारीघाट वा नदीच्या काठावर व परिसरात बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात यावा आशि मागणी खामखेडाचे सरपंच बापू शेवाळे,संयुक्त वनव्यवस्थापन समतिीचे अध्यक्ष दीपक मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे , सुनील शेवाळे आदींनी तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पिंजरा न लावल्यास होणारे नुकसानात वनविभाग जबाबदार राहील. तरी पुढील काळात लवकरात लवकर पिंजरा लाऊन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी करण्यात आली.
खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:38 PM