त्र्यंबकेश्वर : मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात बुधवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडी परिसरात बैलावर हल्ला करत ठार केले. बैलाला सोडविण्यासाठी रमेश मौळे गेले असता त्यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंचनामा करण्यात आला.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ परिसरात या घटनेमुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच गोकुळ गारे व परिसरातील नागरिकांनी केली आहे. वर्षभरापासून संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात किमान सात - आठ बिबट्यांचा वावर वावीहर्ष परिसरापासून ते गडदवणे परिसरापर्यंत असून, ब्रह्मगिरीच्या भातखळ्यात बिबट्याने गाय ठार केली. तालुक्यात वन्यप्राण्यांसाठी जंगलात वनतळे जलाशय राखून ठेवले आहेत. जंगलात नजीकच्या गावातील मोकाट जनावरे चरण्यासाठी गेली की अशा बिबटे व रानडुकरांकडून ते शिकार होतात. जंगल परिसर वन्यप्राण्यांसाठी संरक्षित असते. यास्तव मालकांनी जनावरांना मोकाट न सोडता गावातच चरण्यास सोडावे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले.
बिबट्याने पाडला बैलाचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 11:06 PM