सिन्नर : तालुक्यातील कारवाडी (शहा) येथे चालत्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला करीत दुचाकीस्वाराला जखमी केले. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाडी शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या वाचनालयासमोर सदर घटना घडली.कारवाडी स्वामी समर्थ केंद्रात स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना वस्तीवरील महिलांना सोडण्यासाठी प्रवीण सोपान जाधव (३९) हे दुचाकीहून आले होते. महिलांना केंद्रात सोडल्यानंतर परत ते शहा-कारवाडी रस्त्याने वस्तीवर निघाले होते. याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वार जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या डाव्या पायाला बिबट्याने ओरखडले. बिबट्या दुचाकीचा पाठलाग करु लागल्याने जाधव ओरडत जवळच्या वस्तीवर आधारासाठी गेले. वस्तीवरील शेतकरी ओरडत बाहेर आल्यानंतर बिबट्या माघारी फिरला.जाधव यांच्या पायाला रक्तस्त्राव झाल्यानंतर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वनविभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर वनमंडळ अधिकारी प्रीतम सरोदे, वनरक्षक के. आर. इरकर, नारायण वैद्य यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. जखमी जाधव यांची विचारपूस केली. या परिसरात पिंजरा लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
बिबट्याने घेतली दुचाकीस्वारावर झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 5:52 PM