गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे टेंभुर्णी मळ्यात राहत असलेले किरण बाळू शिंदे या शेतकऱ्याच्या मागील महिन्यात बिबट्याने १३ शेळ्यांसह एक बोकड ठार केला होता. याआधीदेखील या बिबट्याने याच ठिकाणी एक बैल व दोन बोकड फस्त केल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा व बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत वनविभागाच्या वतीने त्या घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला.
यानंतर काही दिवसांतच या ठिकाणी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून, यामुळे येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. परंतु, या ठिकाणी अजूनही एक बिबट्या असून, नागरिकांनी भीती व्यक्त करीत या परिसरात पुन्हा एकदा वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात यावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. वनविभागाकडून पिंजरा लावण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र, ४-५ दिवसांत कोणतीही हालचाल वनविभागाने केलेली नसल्याने शेतकरी व ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. या परिसरात मानवी वस्ती असल्यामुळे बिबट्या पुन्हा या ठिकाणी भक्ष्य शोधण्याच्या उद्देशाने येऊ शकतो. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर पिंजरा लावण्यात येऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
त्याचप्रमाणे दि. १ सप्टेंबरच्या मध्यरात्री इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील कर्पे मळ्यातदेखील एका बिबट्याने श्वानावर हल्ला चढवत फरपटत नेत ठार केल्याची घटना घडली असून, याआधीदेखील या बिबट्याने येथील अनेक गायी, शेळ्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच येथील शेतकरी नामदेव यंदे हे दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना त्यांच्यासमोर दोन बिबटे आल्याने त्यांची बोलतीच बंद झाली. या प्रकारामुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून, या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करीत असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशी तक्रार येथील शेतकरी करीत आहेत.
चौकट...
या ठिकाणी कैलास कर्पे यांचे तीन पोल्ट्री फार्म असून, आजूबाजूलादेखील दोन-तीन पोल्ट्री फार्म आहेत. त्यामुळे बिबट्या या ठिकाणी भक्ष्य शोधण्यासाठी नेहमीच येत असून, आता तर भरदिवसा बिबट्या दर्शन देत असल्यामुळे शेतकरी दिवसा शेतीची कामे करण्यास धजावत नसल्यामुळे शेतीचेदेखील नुकसान होत आहे. यामुळे वनविभागाने या ठिकाणी तातडीने पिंजऱ्याची व्यवस्था करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.