सिन्नर : गुळवंच परिसरात माळ्याचा मळा शिवारात गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्याच्या भीतीने दैनंदिन कामांसाठी मजूर येण्यास तयार नाहीत, तर जिवाच्या भीतीने दहशतीखाली असलेले शेतकरी शेताकडे जात नसल्याचे चित्र आहे.
गुळवंच शिवारात एका बाजूने इंडिया बुल्स कंपनीचा परिसर ओस पडलेल्या अवस्थेत आहे. त्याच बाजूने काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. सुखदेव रामचंद्र सांगळे यांच्या शेतात काम करताना बिबट्याचे दर्शन घडले. लागवड सुरू असलेल्या शेतांमध्ये बिबट्याच्या भीतीने मजूर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जिवाची भीती असल्याने खुद्द शेतमालकांनाही शेतात पाणी भरण्यासाठी, मशागतीसाठी जाता येत नसल्याने द्विधा मन:स्थिती झाली आहे.
दरम्यान, वनविभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिवाची जोखीम घेऊन शेतांमध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.