गुरुवारी (दि.१३) रोजी सकाळी परिसरातील शेतकरी रामभाऊ गिते, विजय चिने, गणेश चिने, महेश चिने हे आपल्या शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना पिंज-यात हालचाल होत असल्याचे जाणवले. त्यांनी जवळ जाऊन पहिल्यानंतर बिबट्या पिंज-यात अडकला होता. या शेतक-यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना घटनेची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी पी. एस. सरोदे, टी. ई. भुजबळ, के. आर. इरकर, ए. टी. रूपवते वनसेवक तुकाराम मेंगाळ, नारायण वैद्य, रोहित लोणारे यांनी तात्काळ पाथरे येथे येऊन बिबट्याला ताब्यात घेतला. सदर बिबट्या नर असून तीन ते चार वर्षे वयाचा असल्याचे वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी येथील शेतक-यांनी बिबट्याचा वावर असल्याचे वनाविभागाला कळविले होते. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतात कामे, पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी जात नव्हते. वनाधिकाºयांनी तात्काळ कारवाई करत अशोक गोरक्षनाथ चिने यांच्या शेतात पिंजरा लावला होता. परिसरातील रानटी डुकरे, शेळ्या यांना बिबट्याने शिकारीसाठी लक्ष केले होते. बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
पाथरे येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 5:10 PM