पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात रविवारी (दि.२) रोजी पहाटेच्या सुमारास उजव्या कालव्याजवळ शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. येथील चिने वस्तीवरील शेतकरी महेंद्र चिने, सुधीर चिने हे पहाटेच्या सुमारास शेकोटीला शेकत होते. त्याच वेळेस महेंद्र यांची नजर शेजारीच असलेल्या उसाकडे गेली असता त्यावेळी उसातून बिबट्या बाहेर येत असल्याचे त्यांना दिसले. महेंद्र यांनी शेजारील शेतकºयांना ऊसाच्या क्षेत्रात बिबट्या असल्याची माहिती दिली. त्यानंतर सकाळी शेतकºयांनी वन अधिकाºयांना या भागात बिबट्या आल्याची माहिती कळवली. वनविभागाचे वनरक्षक के. आर. इरकर, बच्छाव, वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची शेतकºयांसमवेत पाहणी केली. यावेळी ऊसाच्या क्षेत्रालगत बिबट्याच्या पायाची ठसे आढळून आले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहा, कारवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने या भागात शेतकºयांमध्ये दहशत आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने येथील अनंत मोकळ यांची शेळी जखमी केली होती. वन अधिकाºयांनी संभाव्य धोके टाळावे यासाठी उसाच्या कडेला बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाही. त्यामुळे परिसरात दिवसाही भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
पाथरे परिसरात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 2:55 PM