नाशिक : भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना अंदाजे आठ ते दहा महिन्यांचा बिबट्या पाण्याने भरलेल्या एका विहिरीत कोसळला. पूर्व वन विभागाच्या हद्दीतील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील बुबळी घाट येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक लाकडी शिडी दोरीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी विहिरीत सोडली. काही वेळेतच चपळ बिबट्याने सुटकेसाठीचा हा मार्ग ओळखला अन् त्या अधारे शिडीवरून सुरक्षितपणे बाहेर येत धूम ठोकली. बोरगावपासून काही अंतरावर असलेल्या बुबळी चिराई घाट परिसरातील एका विहिरीत बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास कोळला. बिबट्या आपला जीव वाचविण्यासाठी पहाटेपासून विहिरीत धडपड करत होता. विहिरीतून आपली सुटका कशी करता येईल, या प्रयत्नात तो पाण्यातच चकरा घालत डरकाळ्या फोडू लागला. त्याच्या डरकाळ्यांचा आवाज सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांच्या कानी पडला. यावेळी त्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेत आतमध्ये डोकावून बघितले असता बिबट्याची विहिरीत धडपड सुरू असल्याचे दिसले. गावकऱ्यांनी तत्काळ वन विभागाच्या दक्षता पथकाला माहिती कळविली. काही वेळेतच सुरगाणा वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीचा परिसर पूर्णपणे रिकामा करत बघ्यांची गर्दी वन कर्मचाऱ्यांनी दूर केली....अन् बिबट्याचा जीव वाचलावन कर्मचाऱ्यांनी एक लाकडी शिडी विहिरीच्या कठड्यावरून आतमध्ये सोडली अन् शिडी दोरीच्या सहाय्याने भक्कम बांधून ठेवत तेथून काढता पाय घेतला. बुद्धिमान वन्य प्राण्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थतीशी त्वरित स्वत:ला जुळवून घेण्यात तरबेज असलेल्या या चपळ बिबट्याने ती शिडी अनेकदा पायाने हलवून तपासली. त्यानंतरच शिडीच्या लाकडी पायऱ्यांवर पाय टाकून वर येण्यास सुरुवात केली. अखेर काही वेळेतच बिबट्याने विहिरीतून सुखरूपपणे बाहेर आला. काही मिनिटे कठड्यावर बसत भिजलेले शरीर झटकत जंगलाच्या दिशेने झेप घेत पलायन केले.
विहिरीतून बिबट्याने स्वत:च करून घेतली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 1:14 AM
भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना अंदाजे आठ ते दहा महिन्यांचा बिबट्या पाण्याने भरलेल्या एका विहिरीत कोसळला. पूर्व वन विभागाच्या हद्दीतील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील बुबळी घाट येथे ही घटना घडली.
ठळक मुद्देसुरगाणा तालुक्यातील घटना लाकडी शिडीच्या साहाय्याने सुखरूप पलायन