सटाणा : बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे शिवारात सावजाच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या एका शेतकऱ्याच्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात जेरबंद झाला.रविवारी डांगसौंदाणे येथील शेतकरी बापू पंडित सुलक्षण हे कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी खुराड्याजवळ आले असता खुराड्यात बिबट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित खुराड्याचा दरवाजा बंद करून त्यास जेरबंद केले. कोंबड्यांसाठी तयार करण्यात आलेला खुराडा लाकडी नसून मोकळ्या जागेभोवती चेनलिंक फेन्सिंग क रत खुराडा तयार करण्यात आला आहे. यामुळे बिबट्या या जाळीमध्ये वावरत होता.अडीच वर्षांचा बिबट्या शिकार शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे भटकत या खुराड्यात अडकला. सावजावर हल्ला करण्याच्या नादात तो खुराड्यात जाऊन पडला असावा असा अंदाज आहे. सुलक्षण यांनी आरडाओरड करीत पसिरातील नागरिकांना जमविले. बागलाण येथील वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंतराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान, नाशिक येथील वनविभागाच्या कार्यालयातून ‘रेस्क्यू’ पथकाला पाचारण करण्यात आले. पथक पोहोचल्यानंतर दुपारी २ वाजता बिबट्याला ‘ट्रॅन्क्यूलाइज’द्वारे भूल देण्यात आली. बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. दोधेश्वर येथील रोपवाटिकेमध्ये बिबट्याला ठेवण्यात आले आहे. (वार्ताहर)
सावजाच्या शोधात बिबट्या खुराड्यात
By admin | Published: April 24, 2017 1:40 AM