पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा शिवारात कुंभारकर वस्तीवरील नागरिकांना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या मक्याच्या शेतात आरामात चालत गेल्याने पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली. शेतातील ओलाव्यात पावलांचे ठसे मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.या घटनेची माहिती पोलीस पाटील मुजमील चौधरी यांनी येवल्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिली असता, त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना धीर दिला. त्यानंतर, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन या पावलांच्या ठशांचे फोटो घेऊन तज्ज्ञांना पाठविले वनविभागाच्या ठसे तज्ञांनी सदरचे ठसे हे तरसाचे असल्याचे कळविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.यावेळी भवारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेत वस्तीवरील नागरिकांनी घाबरून न जाता व अफवांवर विश्वास ठेवू नये, शेतात असलेल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र पठाडे, आबा पिसाळ पोलीस पाटील, देवकर व वनविभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
पाटोदा शिवारात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:30 PM