निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील निऱ्हाळे ते वावी रोडवरील लक्ष्मण चांगदेव काकड यांच्या शेतातील मका पिकात बिबट्या शिरला असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी कामगार पोलीसपाटील शिवाजी शिंदे यांनी केली आहे. लक्ष्मण काकड यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असून, दुपारी अचानक ऊसतोड कामगारांनी बिबट्या समोरच्या मका पिकात शिरल्याचे बघितले. यानंतर बघ्यांची गर्दी जमा होऊ लागताच कामगार पोलीसपाटील शिवाजी शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. वनक्षेत्रपाल के. आर. ईरकर यांनी रात्रभर वन कर्मचारी वसंत आव्हाड, नारायण वैद्द, संतोष मेंगाळ यांना देखरेख करण्यासाठी ठेवले असून, शनिवारी (दि. ८) येथे पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ईरकर यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच आण्णा काकड, उपसरपंच विष्णू सांगळे, दत्ता यादव, बाळासाहेब दराडे, गणेश यादव, आदी उपस्थित होते.
निऱ्हाळेत बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:14 AM