नाशिकरोड : पळसे शिवारातील मळे भागातील उसाच्या शेतात आढळलेल्या बिबट्याच्या नवजात बछड्यांमुळे मादीचा अधिवास असल्याचे निश्चित झाले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी सोमवारी (दि.२१) भेट देऊन पाहणी केली. बछडे ‘जैसे-थे’ ठेवत त्या भागातील उसतोड थांबविली आहे. पळसे शिवारात रविवारी ऊसतोड करत असताना कामगारांना बिबट्याचे तीन बछडे दिसले. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी बिबट्याच्या बछड्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळपर्यंत वनविभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी देखरेखीसाठी होता.सोमवारी दुपारी नाशिक पश्चिम विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील, विजयसिंह पाटील आदींनी मळ्यात पाहणी केली. बिबट्या मादी एकावेळी जास्तीत जास्त तीन बछड्यांना जन्म देऊ शकते, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वास्तविक त्या ठिकाणी तीनच बछडे असतील किंवा दोन मादींनी बछड्यांना जन्म दिला असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बछड्याच्या दर्शनामुळे परिसरात बिबट्या व मादीचे वास्तव्य असण्याच्या शक्यतेमुळे भीतीचे वातावरण कायम आहे. बिबट मादी व पिले असल्यामुळे या भागात कायद्याने पिंजरा लावता येणार नाही. त्यामुळे मादी पिलांना घेऊन जाण्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नागरिकांनी संयम ठेवत वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्याच्या संचाराने थांबली ऊसतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:49 AM